Ticker

6/recent/ticker-posts

काटोलमध्ये समता सैनिक दलाची विराट समता रॅली; आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी बुलंद आवाज

 



शेकडो समता सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ज्येष्ठ समाजसेवक गुलाबराव तागडे यांच्याकडून गंधकुटी पर्वत (बुद्धभूमी) येथे २,४०० चौ. फूट जागा दानाची घोषणा

काटोल प्रतिनिधी :

समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूर ग्रामीण यांच्या वतीने अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरण (विभाजन) निर्णयाच्या निषेधार्थ आणि तो तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी काटोल शहरात भव्य समता रॅली काढण्यात आली. शेकडो समता सैनिक, पदाधिकारी व समाजबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले.

शासकीय विश्रामगृह, काटोल येथून रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली उपविभागीय अधिकारी तथा तहसील कार्यालयात पोहोचली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करून अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

कार्यक्रमाला समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूरचे मुख्य संयोजक घनश्यामजी फुसे, प्रमोदजी रामटेके, हेमचंदजी उके, ज्येष्ठ समाजसेवक आयु. गुलाबरावजी तागडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विद्येश्वर गजबे, जिल्हा सचिव दिपक ढोके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील नारनवरे, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, पारडसिंगा सर्कल प्रमुख नीलकंठ गजभिये, महिला प्रशिक्षक संध्या सहारे, तालुका प्रमुख लक्ष्मी शेंडे, जिल्हा शाखा संघटक विकास सोमकुवर, सावरगाव सर्कल प्रमुख लांजेवार साहेब, दिलीपजी गायकवाड (जनसेवक), रवींद्र नाईक, दयाकर काटकर, युवराज तायडे, वसंतराव डोंगरे, बळवंता नारनवरे, नामदेव तागडे, प्रमोद चक्रपाणी, गायक व विकासराज गायक यांच्यासह नागपूर ग्रामीणमधील ३३ गावांतील पदाधिकारी व शेकडो समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण

रॅलीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक आयु. गुलाबरावजी तागडे (चिखली-मैना) यांनी गंधकुटी पर्वत (बुद्धभूमी), घुबडमेट येथे असलेली ४० × ६० (२,४०० चौ. फूट) जागा समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूर ग्रामीण, ता. काटोल यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी दान देण्याची जाहीर घोषणा केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन केले.

रॅलीदरम्यान "जय भीम", "संविधान बचाव", "आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

समता सैनिक दलाच्या या भव्य समता रॅलीतून संविधान रक्षण, सामाजिक ऐक्य आणि हक्कांच्या लढ्यासाठी संघटित राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट आणि जागरूकता या रॅलीतून प्रकर्षाने दिसून आली.

Post a Comment

0 Comments