काटोल | प्रतिनिधी
काटोल : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आज नगर परिषद शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके व गणवेशाचेही वितरण करण्यात आले.
पेठ बुधवार येथील नगर परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात शाळा समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. प्रज्ञाताई दिगांबर डोंगरे, नगरसेवक सुरेंद्र लोही, नगरसेविका सौ. हर्षा खंते, नगरसेवक अरुण मानकर, माजी सभापती दिगांबर डोंगरे व सामाजिक कार्यकर्ते रवी खंते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषद कॉन्व्हेंट शाळेतही विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नगरसेविका सौ. प्रज्ञाताई डोंगरे म्हणाल्या, "नगर परिषद विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक शाळेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिक्षणाच्या विकासासाठी निधी खर्च करताना कोणतीही काटकसर केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही."
त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, त्यांच्या अथक परिश्रमामुळे नगर परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा सातत्याने उंचावत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक असून, नगर परिषद यासाठी कायम कटिबद्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक निलेश गावंडे, जायभाये सर, धोपटे सर, राठोड मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments