अंतरवालीत हजारोच्या संख्येने ठेवीदार ढसाढसा रडले; "ED चा पैसा आम्हाला द्या, MPID लावा" - विधवा महिलांची जरांगे पाटलांना विनवणी
जालना / प्रतिनिधी संतराम जाधव
"साहेब, नवऱ्याच्या निधनानंतर मिळालेले 5 लाख ज्ञानराधात ठेवले. मुलीच्या लग्नासाठी. आता सगळं बुडालं. आम्ही जगायचं कसं?" असा टाहो फोडत शनिवारी बीड जिल्ह्यातील एका विधवा महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर व्यथा मांडली. ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने 3700 कोटी बुडवल्याने राज्यातील 50 हजारांहून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
शनिवारी दुपारी अंतरवाली सराटीत बीड, जालना, परभणी, लातूरसह 18 जिल्ह्यांतील 500 हून अधिक ठेवीदारांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी अनेक वृद्ध, महिला व निवृत्त सैनिक ढसाढसा रडत होते. "लेकरांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे गेले, शेतीसाठी साठवलेली रक्कम गेली, आयुष्याची पुंजी गेली", असे सांगताना अनेकांचे आवाज घोगरे झाले होते.
*"ED चा पैसा आमच्या घामाचा"*
ज्ञानराधा ठेवीदार कृती समितीने जरांगे पाटील यांना सांगितले की, "ED ने संचालकांची मालमत्ता जप्त केली आहे. तो पैसा आमच्या घामाचा आहे. सरकारने MPID कायदा लावून ED च्या ताब्यातील सर्व संपत्ती ठेवीदारांना वाटावी. संचालकांच्या बायका-मुलांच्या नावावर असलेली बेनामी मालमत्ताही जप्त करावी. आम्हाला आमचे पैसे हवेत."
*जरांगे पाटलांचे आश्वासन : "तुमच्या लेकरांसाठी लढेन"*
ठेवीदारांची व्यथा ऐकून मनोज जरांगे पाटील भावूक झाले. ते म्हणाले, "3700 कोटी म्हणजे 50 हजार कुटुंबांचं काळीज आहे. विधवा महिलांचे कुंकू, शेतकऱ्यांचं घाम, सैनिकांची पेन्शन या पैशात आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून MPID कायदा लावायला सांगणार. ED ने जप्त केलेला पैसा तुम्हाला मिळालाच पाहिजे. सरकारने ऐकलं नाही तर तुमच्या लेकरांसाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही."
गेल्या दोन वर्षांपासून ज्ञानराधाचे ठेवीदार वसुलीसाठी झगडत आहेत. अनेकांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून दिवस ढकलले आहेत. पोलिसात गुन्हे दाखल होऊनही संचालक मोकाट फिरत असल्याने ठेवीदार संतप्त झाले आहेत.

0 Comments