Ticker

6/recent/ticker-posts

पावसाअभावी बोळेगाव परिसरातील बळीराजा हवालदिल



*शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट*

बिलोली प्रतीनीधी विनोद वाघमारे 

आषाढ महिना सुरू असतानाही बोळेगावसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून अनेक शेतांतील पिके पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी उगवण अपुरी राहिली असून अनेक शेतांमध्ये रोपे वाळण्याच्या मार्गावर आहेत.

बिलोली व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे शेती हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. प्रत्येक वर्षी खरीप हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असतात. यंदाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसने पैसे घेऊन बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र पावसाने साथ न दिल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरातील अनेक शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुबार पेरणी करायची झाल्यास पुन्हा बियाणे, खत, मशागत आणि मजुरीसाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा खर्च परवडणार नाही दमदार पाऊस झाला तरच संजीवनी हवामान अनुकूल राहून लवकरच दमदार पाऊस झाला तर पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. मात्र आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास कासराळी परिसरातील खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या संपूर्ण परिसरातील बळीराजाची नजर आकाशाकडे लागली असून, वेळेत पाऊस पडून शेत पुन्हा हिरवेगार व्हावे, अशीच प्रार्थना प्रत्येक शेतकरी करत आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात असून, "आता पाऊस पडेल" या आशेवर दिवस काढत आहेत.शेतात केलेली मेहनत डोळ्यांसमोर वाया जाताना पाहून बळीराजा हतबल झाला आहे. सकाळ-संध्याकाळ आकाशाकडे नजर लावून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण

होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे दुवार पेरणीसाठी आर्थिक मदत, अनुदानित बियाणे, आवश्यक खते उपलब्ध करून देण्याची तसेच पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments