Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळात सावरगांव धरणाचे पाणी कालव्याने न सोडता जलवाहिनीने विहिरीत सोडा;माजी सरपंचांचा आदर्श जपण्याची ग्रापं सदस्य सुधाकर चव्हाण यांची आग्रही मागणी



 दै लोकयुवा| वाशिम:- एकीकडे यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असून सावरगांव कान्होबा लघु प्रकल्पात  कमी पाणीसाठा शिल्लक आहे, अशा गंभीर स्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे असताना दुसरीकडे स्थानिक ग्रापं पदाधिकाऱ्यांनीच शासकीय कालव्यात जेसीबीच्या साह्याने बेकायदेशीर माती उत्खनन करून कालव्याची भौगोलिक रचनेला नख लावत पाणी उचल केल्या जात असल्याची गट ग्रापं सदस्य सुधाकर लष्कर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तातडीने चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, या निवेदनावर तहसील कार्यालय मंगरूळपीर व जलसंधारण उपविभागाचा दि. २१/१०/२०२६ रोजीचा आवक शिक्का लागला आहे.

सावरगांव कान्होबा लघु प्रकल्प सन १९७७ मध्ये तत्कालीन पाटबंधारे विभागाने बांधला असून त्याची मूळ सिंचन क्षमता ४०२ हेक्टर म्हणजे सुमारे १००० एकर आहे. सध्या हे धरण मृद व जलसंधारण विभाग वाशिमच्या अखत्यारित आहे. गेल्या २० वर्षांपासून पारदर्शक पद्धतीने वार्षिक देखभाल व दुरुस्ती न झाल्याने मुख्य कालवा पूर्णपणे लयास गेला, मोडकळीस आला आणि गळका झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त १०० ते १५० एकरला पाणी मिळते, उर्वरित पाणी नाल्या-ओढ्यात वाहून वाया जाते.  अमूल्य जलराशीची दरवर्षी होणारी नासाडी थांबावी यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा मागील दहा वर्षांपासून सुरू केलेला असून यासाठी आंदोलन सुद्धा केले होते.


माजी सरपंचांनी दाखवला होता आदर्श मार्ग, आताच्या पदाधिकाऱ्यांनी केला उलटा प्रकार*

या ठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी जेव्हा अशीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा सावरगांव कान्होबाच्या माजी सरपंचांनी कालव्याद्वारे पाण्याची नासाडी टाळली होती. त्यांनी थेट धरणावर मोटर पंप बसवून जलवाहिनीद्वारे पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आणून सोडले होते. त्यामुळे गळक्या कालव्यातून पाणी वाया न जाता गावाला थेट पिण्याचे पाणी मिळाले होते. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा तो आदर्श आजही गावकरी सांगतात. मात्र, सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी उलट त्या गळक्या कालव्यालाच जेसीबीने खोदून आणखी नादुरुस्त करून स्वतःच्या राजकीय स्वार्थ व प्रतिष्ठेसाठी कालव्यातून पाणी सोडून हे पाणी लोकवर्गणीतून सोडले जात असल्याच्या भूलथापा देऊन जलसंपदेची नासाडी चालविली असल्याचा आरोप ग्रापं सदस्य चव्हाण यांनी केला आहे.

धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याचे सांगितले जात असलेले विधान खोटे असून मृदा व जलसंधारण विभागाने यापूर्वी आंदोलन झाल्यावर गळतीला ब्रेक लावला होता. उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे मोठे दुर्लक्ष या प्रकल्पाकडे असल्याने या धरणातील पाणी पेटलेले असल्याचे गंभीर प्रकार पुढे येत आहे. 

गट ग्रामपंचायत सावरगाव कान्होबा येथील नागरिकांना व पशुपक्ष्यांना तथा वन्यजीवांसाठी पुढील जून जुलै महिन्यापर्यंत धरणातील पाणी प्यायला व वापरायला मिळावे यासाठी विद्युत मोटर पंप ने पेयजल पुरवठा करणाऱ्या विहिरीत माजी सरपंच प्रमाणे यावेळी सुद्धा पाणी आणण्याचे नियोजन प्रशासनाने करण्याची आग्रही मागणी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर लष्कर चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments