सुरोडीत २६ हजारांचे कृषी साहित्य लंपास स्थानिक टोळीचा हात असल्याचा संशय; श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेकडे लक्ष
श्रीगोंदा लोकयुवा न्यूज : तालुका प्रतिनिधी
सुरोडी : एकीकडे भीषण दुष्काळ आणि दुसरीकडे सणासुदीचा काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता चोरट्यांनी लक्ष केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी येथील एका शेतकऱ्याच्या कांदाचाळीतून S.T.P. पंप व फवारणीचे साहित्य असा सुमारे २६ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. सुरोडी ता. श्रीगोंदा येथील शेतकरी कचरू मल्हारी वागसकर यांची भानगाव-सुरोडी शिवारात शेती असून तेथे त्यांची कांदाचाळ आहे. गेली १० ते १५ वर्षे ते आपले शेती उपयोगी अवजारे याच ठिकाणी सुरक्षित ठेवतात. मात्र, ४ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ब्लोअरचा S.T.P. पंप चोरून नेला. हा प्रकार ५ तारखेला सकाळी उघडकीस आला.
त्यानंतर पुन्हा ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चोरट्यांनी औषध फवारणीचा ३०० फूट पाईप आणि गन देखील कापून नेल्याचे निदर्शनास आले. या चोरीत S.T.P. पंप (२० हजार रुपये) तसेच पाईप व गन (६ हजार रुपये) असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सध्या भयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यातच एवढे महागडे साहित्य चोरीला गेल्याने ते पुन्हा घेणे शेतकऱ्याला कठीण झाले आहे. चोरी करण्याची पद्धत पाहता, यात परिसरातीलच एखाद्या स्थानिक चोरांचा हात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी शेतकरी कचरू वागसकर यांनी ७ नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपासात कोणतीही दिरंगाई न करता, तातडीने चोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि अन्नदात्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

0 Comments