तिवसा तालुका व शहर काँग्रेस कमिटीची मागणी
प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी जिल्हा वर्धा.
"कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी दिलेला लोकशाही कौल डावलून शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या निषेधार्थ आज, सोमवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार, तिवसा यांना निवेदन सादर करण्यात आले
गोकुळ दूध संघाच्या २५ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही शासननियुक्त पाच सदस्यांपैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन निवडून आलेल्या संचालक मंडळाचे सत्तासमीकरण बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला
निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल हाच लोकशाहीचा खरा आधार असून, सरकारी नियुक्त्यांच्या माध्यमातून बहुमताचे गणित बदलणे सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेला आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे. त्यामुळे शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, निवडून आलेल्या संचालकांच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवडणूक कायद्यानुसार व पारदर्शक पद्धतीने घ्यावी आणि या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप होऊ नये, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
सहकार क्षेत्रातील लोकशाही परंपरा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि सभासदांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमूख, अतुल गवड, नगरसेवक अमर वानखडे, कार्याध्यक्ष सुनिल बाखडे, नगरसेवक योगेश वानखडे, नगरसेवक किसन मुंदाणे, नगरसेवक नरेश लांडगे, गजानन भोंबे, प्रमोद बोराळकर, हरिदास भगत, शब्बीर शहा, संजय चौधरी, पंकज कळंबे,अनिकेत प्रधान, गौरव चौधरी, प्रशिक शापामोहन, आकाश मकेश्वर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व माहिती आशिष देशमुख तिवसा यांनी कळविली आहे.

0 Comments