Ticker

6/recent/ticker-posts

मुलींच्या पालकांना नम्र विनंती - प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच निर्णय घ्या - वैचारिक प्रबोधनाची गरज



विवाह हा करार नसून संस्कार आहेत

प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी 

" लग्न जुळवणीच्या बाजारात फक्त बायोडाटा आणि डिग्रीला महत्व आले असून प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. प्रत्येक पालकाला सरकारी नोकरदार जावई हवा आहे, पण सरकारी नोकरी सर्वांना कुठून मिळणार? हा प्रश्न आज गंभीर बनला आहे. बागायती शेती असलेली, प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी मुले केवळ शेतकरी आहे म्हणून नाकारली जात आहेत. इंजिनिअर झालेली मुले कंपनीत ८ हजार रुपयांवर सुपरव्हिजन करतात, पोलीस भरतीच्या रांगेत डिग्रीवाली मुले उभी असतात, हे वास्तव पालकांनी पाहणे गरजेचे आहे. मुलींचे वय २८ ते ३५ वर्षे झाले तरी अपेक्षांचे ओझे वाढतच आहे आणि यामुळे मुलींच्या भावनांचा विचारच होत नाही. सरासरी आयुष्य ६० वर्षे असताना ३० वर्षे फक्त स्थळ शोधण्यात घालवायची का?

 हा विचार करण्याची वेळ आली आहे. युधिष्ठिराने सांगितल्याप्रमाणे मरायचे सर्वांना आहे पण मरावेसे कोणालाच वाटत नाही, तसेच अन्न सर्वांना हवे आहे पण शेतकऱ्याशी लग्न करावेसे वाटत नाही, पाणी सर्वांना हवे आहे पण पाणी वाचवावेसे वाटत नाही, सावली सर्वांना हवी आहे पण झाडे लावावी असे वाटत नाही, सून सर्वांना हवी आहे पण मुलगी व्हावी असे वाटत नाही. हीच आजची विदारक परिस्थिती असून यावर वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलींच्या पालकांनी घर बसल्या पाकिस्तानसारखी स्वप्ने न बघता प्रत्यक्ष शेतात, घरी जाऊन पाहणी करून मगच निर्णय घ्यावा, असे आवाहन सामाजिक स्तरातून होत आहे.


आजची लग्नसंस्था ही बायोडाट्याच्या कागदावरच अडकली आहे हे दुर्दैव आहे. आम्ही स्वतः पाहतो की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये असते. सरकारी नोकरी हेच सुखाचे मापदंड समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. मी अनेक शेतकरी मुलांना पाहिले आहे जे महिन्याला लाखो रुपये उत्पन्न घेतात पण केवळ नोकरी नाही म्हणून त्यांना नाकारले जाते. पालकांनी आपल्या मुलाला सरकारी नोकरी लावू शकतो का याचा आधी विचार करावा. डिग्रीपेक्षा माणसाची नियत आणि कष्ट करण्याची तयारी महत्वाची आहे. म्हणून माझे स्पष्ट मत आहे की स्थळ प्रत्यक्ष बघितल्याशिवाय निर्णय घेऊ नये.--अनिल वि.बजाईतप्रदेशाध्यक्ष नागपूर

मी गेल्या २० वर्षांपासून वधू-वर सूचक मंडळाचे काम पाहतोय. पूर्वी लोक मुलगा कसा आहे हे पाहायचे, आता फक्त पगार स्लिप पाहतात. अनेक मुलींचे बायोडाटा पाहिले की वय ३० च्या पुढे गेलेले असतात पण अपेक्षा काही कमी होत नाहीत. शेतकरी कुटुंबातील मुले ही संस्कारी आणि कुटुंबाला जपणारी असतात. मुलांना नोकरी नाही म्हणून काही पालक स्थळे नाकारता, त्यामुळे ही लग्न न जुळण्याची अवस्था आहे. बागायती शेती असलेले स्थळ हे सरकारी नोकरीपेक्षा कितीतरी पटीने चांगले असते. माझी सर्व पालकांना विनंती आहे की डोळसपणे विचार करा आणि शेतात जाऊन सत्यता पडताळा.मुलांच्या पगारापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाचा सर्वव्यापक विचार करायला. हवा.--अविनाश ल.टाकेप्रदेश उपाध्यक्ष आर्वी

हा मेसेज वाचून मला खूप आनंद झाला कारण हे कटू सत्य आहे. आमच्या आर्वी तालुक्यात अनेक चांगली स्थळे केवळ सरकारी नोकरी नाही म्हणून नाकारली जातात. मुलींच्या पालकांनी हे लक्षात घ्यावे की नोकरी आज आहे उद्या नाही, पण शेती ही पिढ्यानपिढ्या राहते. खोटे बोलून लग्न लावणाऱ्यांवर प्रेम करू नका. सरकारी नोकरीच्या दुकानावर एक लाख रुपये दिले की नोकरी मिळते का, याचा विचार करा. माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करावा, पैशाचा नाही. शेतकरी मुलाशी लग्न करणे हे कधीही कमीपणाचे नाही.मुलांच्या स्वभावाचा विचार करावा.--अरुण म.कहारे,विदर्भ प्रमुख आर्वी

एक सेवानिवृत्त प्राध्यापक म्हणून मी हे रोज अनुभवतो. विद्यार्थी मोठ्या कष्टाने डिग्री घेतात पण नोकरीच्या बाजारात त्यांची किंमत ८ ते १० हजार रुपये असते. हीच मुले जर शेतीत लक्ष घातले तर लाखो रुपये कमवू शकतात. पण समाजाने त्यांना दुय्यम स्थान दिले आहे. पालकांनी आपल्या मुलीच्या बायोडाट्यामध्ये अपेक्षांची यादी वाढवण्यापेक्षा चांगल्या माणसाचा शोध घ्यावा. आयुष्याचा जोडीदार हा डिग्रीवर नाही तर स्वभावावर ठरतो. २८ ते ३५ वयोगटातील मुलींचे प्रमाण वाढणे हे चिंताजनक आहे. यावर वेळीच विचार झाला पाहिजे, अन्यथा सामाजिक संतुलन बिघडेल.--प्राध्यापक सुरेन्द्र गोठाणे विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आर्वी

मी स्वतः वधू-वर परिचय मेळाव्याचे काम पाहून सामाजिक कार्य करतो. हा संदेश घराघरात पोहोचला पाहिजे. आम्ही पाहतो की लोकांना अन्न हवे आहे पण अन्न पिकवणारा नको आहे, ही कुठली मानसिकता आहे. लग्न हा दोन जीवांचा नाही तर दोन कुटुंबांचा मिलाप असतो. त्यामुळे फक्त कागदावरचे आकडे न बघता माणसे बघा. शेतकरी कुटुंबातील सुसंस्कार हे इतरत्र कुठेही मिळणार नाहीत. माझे सर्व तरुणांना आणि पालकांना आवाहन आहे की परिवर्तन घडवायचे असेल तर विचार बदला. हा मेसेज फक्त आवडून चालणार नाही तर पुढे पाठवून प्रबोधन करा.ज्ञानेश्वर वा.आसोले वधू-वर संस्थापक महाराष्ट्र राज्य आर्वी..

Post a Comment

0 Comments