Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव राऊत येथे बालमजुरीविरोधात जनजागृती...



(विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; स्त्री-पुरुष समानतेचा संदेश)

 काटोल प्रतिनिधी :-विकास सोमकुवर 

पिंपळगाव राऊत, ता. नरखेड : जिल्हा परिषद शाळा, पिंपळगाव राऊत येथे बालमजुरी निर्मूलन, बालहक्क आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Agrigenic Farmer Producer Company Limited आणि Vijay Cotton and Fiber VO. LLP यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढून ग्रामस्थांना बालमजुरीविरोधात जागरूक केले.

यावेळी डॉ. बुद्धभूषण वानखेडे, प्रकल्प व्यवस्थापक (पुनरुत्पादक व सेंद्रिय शेती), श्री. अमोल जीवतोडे, प्रकल्प अधिकारी आणि आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री. नितीन वराडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालपण हे शिक्षण, खेळ आणि सर्वांगीण विकासासाठी असून कोणत्याही बालकाला बालमजुरीकडे ढकलले जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

स्त्री-पुरुष समानतेबाबत मार्गदर्शन करताना मुलगा आणि मुलगी यांना शिक्षण, सन्मान, स्वातंत्र्य व प्रगतीच्या समान संधी देण्याचे आवाहन करण्यात आले. बालमजुरी निर्मूलनासाठी पालक, शिक्षक, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला उपसरपंच श्री. मोहन निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. पंकज निंबाळकर, क्षेत्रीय अधिकारी यांचा पुढाकार होता. तसेच जिल्हा परिषद शाळेचे श्री. वैभव इंगोले सर यांनी विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीद्वारे बालमजुरी निर्मूलन, शिक्षणाचा अधिकार आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. “बालपण शिक्षणासाठी, बालमजुरीला नकार; स्त्री-पुरुष समानतेतून घडवूया सक्षम समाज!” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments