जव्हार: जव्हार शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळ, बाजारपेठ, वस्ती तसेच शाळांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना या कुत्र्यांचा धोका सहन करावा लागत आहे.
शहरातील घोरवाडी गोरवाडी, मोर्चा, जांभूळ विहीर, पाच बत्ती, सोनार आळी, गांधी चौक, मुकणे कॉलनी, अंबिका चौक, तारपा चौक हनुमान पॉईंट या भागांत मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, काही ठिकाणी नागरिकांवर धावून जाण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाने हालचाल करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील वर्दळीचे रस्ते, शाळा, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वावर नियंत्रित करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्राणीजन्मनियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरण आणि संबंधित पशुवैद्यकीय यंत्रणेच्या मदतीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तक्रारींची त्वरित दखल घेणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरत आहे .
जव्हार शहरात वाढलेल्या बेवारस कुत्र्यांमुळे दुचाकी स्वार, पादचारी नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना रोजच बेवारस कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अंगावर भुंकणे चावा घेणे दुचाकी स्वरामागे लागणे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने हा विषय गंभीरपणे घेत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. - पंकज मुकणे, सामाजिक कार्यकर्ते, जव्हार

0 Comments