Ticker

6/recent/ticker-posts

ग्राममंगल केंद्रात शिक्षकांचा शैक्षणिक अभ्यास दौरा; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवी दिशा



जव्हार, दि.२३; प्रतिनिधी फैजान खान 

जव्हार: पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या नेतृत्वाखाली ऐना येथील ग्राममंगल केंद्रात गुरुवारी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी बालकेंद्रित शिक्षणाच्या विविध संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

    बालशिक्षण, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण, सहज शिक्षण आणि मुक्त शिक्षण या विषयांवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या वयानुसार आणि त्यांच्या आकलनक्षमतेनुसार शिक्षणपद्धती विकसित करण्याचे महत्त्व या दौऱ्यातून अधोरेखित झाले. या अभ्यास दौऱ्यात विस्तार अधिकारी मनीषा डांगे, केंद्र समन्वयक आणि आयडॉल शिक्षक सहभागी झाले होते. दौऱ्याची जबाबदारी केंद्र समन्वयक विष्णू पीलाना यांनी सांभाळली. तसेच जगन्नाथ किरकिरे, नितीन तीडोळे, प्रफुल्ल पाटील, महेंद्र सहारे, युवराज वाघ, राजेंद्र गोफणे, ढवळू बांबरे, राजेश भरसट यांच्यासह अन्य केंद्र समन्वयक व गुणवंत शिक्षकांनी सहकार्य केले.

    बालकांच्या विकासातील तीन ते आठ वर्षे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या वयोगटात अनुभवाधारित, कृतीयुक्त आणि मुक्त शिक्षणाला प्राधान्य दिल्यास मुलांच्या आकलनशक्तीला, सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. जव्हार, मोखाडा आणि तलासरीसारख्या दुर्गम भागांतही या शिक्षणपद्धतींचा प्रभावी वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होऊ शकते असे केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष मधुकर भोये यांनी सांगितले. शिवाय, बालकेंद्रित शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा अभ्यास दौऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, शिक्षकांना अध्यापनाच्या नव्या पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळते,” असे मत गटशिक्षणाधिकारी टाळकुटे यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments