रत्नागिरी (खेड) - वावे तर्फे खेड, सापिर्ली, चोरवणे, पोसरे येथील सुमारे १३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्यासाठी अंदाजे रु.१ कोटी ९६ लाख निधीची आवश्यकता आहे. सदर निधी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून मंजूर करण्यात यावा, तसेच, सदर रस्त्याचे वर्गीकरण हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत करावे. अशी विनंती मुंबई, पुणे व गावातील ग्रामस्थ तसेच विविध मंडळांच्या वतीने मा. आमदार श्री. भास्कर जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात पंधरागाव जनता सेवा संघ यांच्या वतीने मा. आमदार श्री. भास्कर जाधव यांना सविस्तर पाठपुरावा पत्र सादर करण्यात आले असून, या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून कामास लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, त्याची सध्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या कामास प्राधान्य देऊन आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

0 Comments