Ticker

6/recent/ticker-posts

घाटली ग्रामपंचायतीत निधीवरून वाद पेटला; जुन्या नव्या कारभाराची चौकशी करा 




अक्राणी ता. प्रतिनिधी: वसंत पावरा.

      नंदुरबार, १० जून: धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग आणि पेसा (PESA) निधीच्या कथित गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ग्रामस्थांनी जुन्या कारभारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेकडे धाव घेतली आहे, तर दुसरीकडे सध्याचे सत्ताधारी पदाधिकारी दिलीप मोजा पाडवी व मिठ्या वाहऱ्या पटले यांच्या गटाने थेट जिल्हाधिकारी मिताली सेठी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना निवेदन देऊन २०१४ ते २०२१ या काळातील खर्चाची सखोल चौकशी करण्याचे उलट आव्हान दिले आहे.


काम न करताच निधी हडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप

ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, सन २०१४ ते २०२१ या वित्तीय वर्षांमध्ये घाटली ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून आणि पेसा अंतर्गत मोठा विकास निधी प्राप्त झाला होता. मात्र, प्रत्यक्षात गावामध्ये कोणतीही विकासकामे न करता परस्पर निधी लाटून गैरव्यवहार करण्यात आला आहे. कागदोपत्री मात्र विकासकामांच्या नावाखाली निधी खर्च दाखवून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून प्रशासनाने या प्रकरणी वर्षानिहाय व मुद्देनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.


१४ मुद्द्यांच्या चौकशीची मागणी; 'आम्ही पुरावे देण्यास तयार'

या गैरव्यवहार प्रकरणाची सत्यता समोर यावी यासाठी २०१४ ते २०२१ या काळातील खालील महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आणि माहितीची मागणी करण्यात आली आहे:

१४ वा वित्त आयोग आणि पेसा निधीचे संपूर्ण विवरण व बँक खात्यांचे स्टेटमेंट.

मंजुरी मिळालेल्या सर्व विकासकामांची यादी आणि कामांवर झालेल्या खर्चाचे तपशील.

काम सुरू होण्यापूर्वीचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्रे.

ग्रामसभेचे ठराव, उपस्थिती नोंदवही, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आदेश.

मोजमाप पुस्तिका (MB), कंत्राटदार, पुरवठादार, लाभार्थ्यांची माहिती, तपासणी अहवाल आणि उपयोगिता प्रमाणपत्रे (UC).

"आम्ही २०२२ नंतर विकासकामे केली" - 

या संपूर्ण वादावर आपली बाजू मांडताना सध्याचे सत्ताधारी दिलीप पाडवी म्हणाले, "२०२२ ते २०२५ या कालावधीत आम्ही सत्तेत आहोत. या काळात आम्ही अंगणवाडी इमारत बांधकाम, गावांतर्गत सिमेंट रस्ते, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना अशी अनेक विकासकामे केली आहेत. प्रत्येक कामाचे जिओ-टॅग फोटो, बिले व ग्रामसभेचे ठराव आमच्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध आहेत."

वाद नेमका कशावरून?

 खरा गैरव्यवहार जुन्या काळात झाला आहे. "सन २०१४ ते २०२१ या ८ वर्षांत १४ व्या वित्त आयोग व पेसा निधीतून लाखो रुपये आले, पण त्या काळात गावात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. 

जुन्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर गैरव्यवहार करून कागदोपत्री खर्च दाखवला. त्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे."

खोटे आरोप केल्यास अब्रूनुकसानीचा इशारा

दिलीप पाडवी व मिठ्या पटले यांच्यासह ग्रामस्थांनी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "प्रशासनाने २०१४ ते २०२१ या कालावधीची सखोल चौकशी करावी. आम्ही २०२२ ते २०२६ या आमच्या कार्यकाळाच्या चौकशीसाठी देखील पूर्णपणे तयार आहोत. मात्र, आमच्यावर कोणीही खोटे व बदनामीकारक आरोप करू नयेत. जर चौकशीत आमच्या काळात गैर आढळले नाही, तर खोटे आरोप करणाऱ्यांना नियमानुसार अब्रू नुकसानीची भरपाई द्यावी लागेल."

पुढील दिशा

"जुन्या कारभाराची पोलखोल झाली पाहिजे व दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी," अशी मागणी मिठ्या पटले यांनी केली आहे. सामान्यतः विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात, मात्र येथे सत्ताधारी गटानेच स्वतःहून जुन्या कार्यकाळाच्या चौकशीची मागणी केल्याने घाटली ग्रामपंचायतीतील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. आता या चौकशीतून नेमका काय घोटाळा समोर येतो, याकडे संपूर्ण धडगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे


Post a Comment

0 Comments