Ticker

6/recent/ticker-posts

केजची लेक ठरली विश्वविजेती! जागतिक योगासन स्पर्धेत हिंदवी चौरेला दोन सुवर्णपदके



जिल्हा  प्रतिनिधी . सागर काळे 

केज: ​गुजरात मधील अहमदाबाद येथे आयोजित जागतिक योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हिंदवी परमेश्वर चौरे हिने दोन सुवर्णपदके जिंकून जागतिक पातळीवर देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. योगासन भारतच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या सहकार्याने या प्रतिष्ठित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील अव्वल योगपटूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये हिंदवीने सब-ज्युनिअर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात आपल्या उत्कृष्ट आणि अचूक कौशल्याचे प्रदर्शन करत हे ऐतिहासिक यश संपादन केले.


​या सुवर्ण कामगिरीमुळे हिंदवी जागतिक योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी बीड जिल्ह्यातील दुसरी योगपटू ठरली आहे. केजच्या ग्रामीण भागातून कष्टाच्या जोरावर तिने घेतलेली ही झेप अत्यंत कौतुकास्पद असून तिच्या या यशामुळे भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर पडली आहे. हिंदवीच्या या जागतिक सुवर्ण यशाची वार्ता समजताच संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तिची ही यशोगाथा इतर असंख्य युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.


Post a Comment

0 Comments