आळते (ता. हातकणंगले) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आळते येथे प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी शाहू कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने मंगळवार (दि. १० जून २०२६) रोजी हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आळते येथील प्रगतशील शेतकरी व शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निसार उर्फ राजू मुजावर यांच्या शेतावर हा उपक्रम पार पडला. यावेळी कृषी सहायक बी. डी. आवळे व हळदे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी, पेरणीपूर्व मशागत, पेरणीदरम्यान घ्यावयाची काळजी, पिकांचे कीड-रोग व्यवस्थापन, लागवड पद्धती तसेच खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षी करण्यात आलेल्या मृदा परीक्षणाचे अहवालही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी हातकणंगले कृषी विभागाच्या कृषी अधिकारी सौ. संगीता तराळ उपस्थित होत्या. त्यांनी माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमास आळतेच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. जयश्री नलवडे, रमजान मुजावर, दिलीप शेळके, दीपक बागवडे, अमोल चौगुले, इम्रान मुजावर, सिद्धार्थ संकान्ना, बाबू मुजावर, अनिल बिरंजे, धुळा गोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी जय जवान जय किसान शेजारी गटाचे सचिव मेजर उत्तम नलवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 Comments