बिलोली | प्रतिनिधी:- विनोद वाघमारे
दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बिलोली तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बिलोली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठी दुकाने, कोचिंग क्लासेस तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच विविध सामाजिक संघटना व समविचारी पक्षांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण व्हावे, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
बंद दरम्यान बिलोली शहरात शांततापूर्ण वातावरण राहिले. व्यापारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याने बिलोली शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

0 Comments