काटोल प्रतिनिधी | पिंपळगाव राऊत (ता. काटोल)
गेल्या अनेक दशकांपासून स्वस्त धान्य दुकानाच्या सुविधेपासून वंचित असलेल्या पिंपळगाव राऊत येथील ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर संपली असून, नव्याने मंजूर झालेल्या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
गावात स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे ग्रामस्थांना रेशनसाठी सुमारे पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोहनजी निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न तसेच मा. सतीशजी रेवतकर यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर गावाला स्वस्त धान्य दुकानाची मंजुरी मिळाली.
महिला सशक्तीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने हे दुकान समता महिला बचत गट यांच्याकडे चालविण्यास देण्यात आले असून, यामुळे गावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले, "मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, ही माझी प्राथमिकता आहे. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन." यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहनही केले.
या कार्यक्रमाला मा. सतीश रेवतकर, नीलिमाताई रेवतकर, सौ. दर्शना वानखेडे, मारोतरावजी बोरकर, संजयजी पाटील, तहसील कार्यालयाचे श्री. निरगुडे, कुणाल ढबाले, संदीपजी सरोदे, चंद्रशेखरजी चिखले, मनोहर यशवंतराव राऊत, पंकज निंबाळकर, सौ. वैशाली घोरपडे, जिजाबाई राऊत, वैशाली धुर्वे, मंदाबाई धुर्वे, मंगला कांबळे, सूरज राऊत, प्रभाकरजी राऊत, शंकरराव धुर्वे यांच्यासह ग्रामस्थ, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समता महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावात स्वस्त धान्य दुकान सुरू झाल्याने नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत या सुविधेचे स्वागत केले.

0 Comments