पूरग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दुरुस्तीची कामे सुरू
पालघर | प्रतिनिधी केविल पाटील
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी डहाणू तालुक्यातील चिंचणी व परिसरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बचाव, मदत व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कामकाजाची तपासणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान त्यांनी तोवी तलाव, पोसरे तलाव, पोहरे तलाव पाडा, वाणीपाडा, कोलवली परिसर, प्रभूपाडा-मासोली, इराणी रोड तसेच नारपाड येथील पुलाची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नुकसानग्रस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वतीने तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे सुरू करण्यात आली असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चिंचणी येथील आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला. तसेच पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
पूरप्रवण भागांवर सातत्याने लक्ष ठेवणे, पाण्याचा निचरा सुरळीत करणे, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले.

0 Comments