धारूर प्रतिनिधी: चेतन लोखंडे /
सरस्वती विद्यालय, किल्ले धारूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य व दिव्य वारकरी दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक वेशभूषेमुळे उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा आनंद अनुभवता आला.
या दिंडीत सहभागी झालेल्या बालचिमुकल्यांनी विठ्ठलभक्तीवरील मनमोहक नृत्य, अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात उत्कृष्ट सादरीकरण करून पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तिभाव पाहून उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
दिंडीने गावातील विविध गल्लीबोळांतून मार्गक्रमण करत "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" अशा जयघोषांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचा विचार, भक्ती, समता, प्रेम, शिस्त आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. विद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
"विठ्ठल नामाचा गजर, संस्कारांचा साज आणि भक्तीचा संदेश" देणारी ही आषाढी एकादशीची वारकरी दिंडी सरस्वती विद्यालय, किल्ले धारूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविस्मरणीय ठेवा ठरली.

0 Comments