श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२२ च्या परीक्षेचा निकाल दि. १ ऑगस्ट रोजी जाहीर झाला होता. या परीक्षेत माहूर येथील भूमिपुत्र शिवम सुरेश गिऱ्हे यांनी राज्यात १६१ वा क्रमांक पटकावत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर यशस्वी झेप घेतली आहे.
शिवम यांचे प्राथमिक शिक्षण माहूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर सैनिक शाळा, वाशीम येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अहमदपूर येथे उच्च शिक्षण घेतले. पुढे जळगाव येथे अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची कठोर तयारी केली. अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी MPSC परीक्षेत १६१ वा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त केले.
शिवम यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे एक वर्षाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्यांची नियुक्ती गडचिरोली परीक्षेत्रात करण्यात आली आहे. ते दि. १५ जूनपासून महाराष्ट्र पोलीस दलात अधिकृतपणे रुजू होणार आहेत.
दि. ९ जून रोजी नाशिक येथे झालेल्या दीक्षांत समारंभानंतर शिवम गिऱ्हे यांचे माहूर येथे आगमन झाले. यावेळी टी-पॉइंट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत माहूरकरांनी ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे भव्य स्वागत केले. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवम यांच्या यशामागे त्यांच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. त्यांचे वडील सुरेश गिऱ्हे हे एका खाजगी बँकेत डेली कलेक्शनचे काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी शिवमच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र कष्ट घेतले.
सुरेश गिऱ्हे यांनी भावनिक होऊन सांगितले की
"आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मुलाच्या शिक्षणासाठी अनेक संकटे, अडचणी आणि संघर्ष पाहिले; पण त्याला शिकविण्याचा निर्धार कधी सोडला नाही. आज माझा मुलगा पोलीस उपनिरीक्षक बनून महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या यशामुळे माझ्या सर्व कष्टांचे चीज झाले. हा केवळ माझ्या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण माहूर शहराचा अभिमान आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले तर अशी अनेक यशोगाथा घडू शकतात."

0 Comments