Ticker

6/recent/ticker-posts

सुरेखा पावरा यांच्या मृत्यूने मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह!


आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तरुणावर आरोप
; दोन गृहपालांवर कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणाची तक्रार


दैनिक लोकयुवा वलवाल /धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा

नंदुरबार येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनी सुरेखा भीमसिंग पावरा (वय २०, रा. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार) हिचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सुरेखाच्या वडिलांनी नंदुरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, तर वसतिगृहातील दोन गृहपालांवर कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सुरेखा ही नंदुरबार येथील एम.के.डी. कॉलेजमध्ये नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती जाणता राजा चौकापासून चौपाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील तापी इमारतीत वास्तव्यास होती.

३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता सुरेखाच्या भावाला विशाल सुरेश पावरा याचा फोन आला. त्याने सुरेखाने वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्याची माहिती दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही माहिती मिळताच सुरेखाचे वडील, आई आणि इतर नातेवाईक वसतिगृहात पोहोचले. तेथे सुरेखा खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

विशाल पावरा याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, विशाल सुरेश पावरा (रा. आंबापूर, ता. शहादा) हा सुरेखाचा नातेवाईक असून त्याची वसतिगृहात ये-जा होती. सुरेखा आणि विशाल यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याने विशालच्या त्रासाला कंटाळून सुरेखाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. विशाल यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दोन गृहपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणात वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती नलिनी अहिराराव आणि छबीताई हरीदास डोंगरे यांच्याविरुद्धही तक्रार करण्यात आली आहे. सुरेखावर योग्य लक्ष ठेवले गेले नाही तसेच कर्तव्य बजावताना हयगय व निष्काळजीपणा झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

या घटनेमुळे शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल, देखरेख आणि गृहपालांच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत का, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे असून त्यांची सत्यता पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे. संबंधित व्यक्तींवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. प्रशासनाने या घटनेची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.



Post a Comment

0 Comments