Ticker

6/recent/ticker-posts

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात!


खाऊच्या पैशांची बचत करून विद्यार्थ्यांनी जमा केला मदतनिधी


दैनिक लोकयुवा श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे) : 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्यांसोबतच चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांची बचत करून विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मदतनिधी जमा केला. मालवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय जोशी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मदतनिधी संकलनाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देत मुख्याध्यापक संजय जोशी यांनी मालवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या सामाजिक कार्याची सुरुवात केली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी शाळेला भेट दिली. त्यांच्यासोबत पंचायत समितीचे गटसमन्वयक काशीनाथ थोंटे, केंद्र समन्वयक संतोष मोहन चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. अरुण धकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैशांतून बचत करून मदत फेरीच्या माध्यमातून निधी जमा केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देत गावचे पोलीस पाटील शरद बेहेरे, विलास बेहेरे तसेच अंगणवाडी सेविका शीतलताई बेहेरे यांनीही आपले योगदान दिले. संकलित करण्यात आलेला मदतनिधी विद्यार्थ्यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि गरजूंना मदत करण्याची भावना रुजविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. मुख्याध्यापक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेले योगदान पाहून गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक संजय जोशी यांचे गावकऱ्यांसमक्ष अभिनंदन केले.

चिमुकल्या हातांनी केलेली ही छोटीशी मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माणुसकीचा मोठा आधार ठरत असून, मालवाडा शाळेचा हा उपक्रम समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments