Ticker

6/recent/ticker-posts

यात्रेतील गर्दीला शिस्त लावण्यासाठी दिग्रस पोलिस प्रशासनाचा पुढाकार बेशिस्त पार्किंगवर कारवाई



दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 


दिग्रस शहरात सुरू असलेल्या यात्रेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असून,खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत यात्रा परिसरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पद्धतीने दुचाकी उभ्या केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले असता दिग्रस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी याची गंभीर दखल घेऊन दिग्रस वाहतुक पोलिसांच्या वतीने रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाईची मोहीम राबविली.

यात्रेच्या ठिकाणी विविध दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने थाटण्यात आली आहेत.त्यामुळे दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक वाहनधारक खरेदीसाठी येताना आपली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला किंवा गर्दीच्या ठिकाणी उभी करतात. काही ठिकाणी दुचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून, वाहतुकीची कोंडी होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.यामुळे पादचारी, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

गर्दीच्या वेळी रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर दिग्रस वाहतुक पोलिसांनी यात्रा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकींच्या विरोधात कारवाई केली. पोलिस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे बेशिस्त वाहनधारकांना चांगलाच धडा मिळाला आहे.


Post a Comment

0 Comments