Ticker

6/recent/ticker-posts

नांदुरी–अभोणा रस्त्यावर काळाचा घाला! कार-दुचाकीची समोरासमोर धडक; दोन युवक गंभीर जखमी



चिखली पाडा फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांची तत्परता, १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना वणी येथे हलवले


   दैनिक लोकयुवा   प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे

कळवण तालुक्यातील नांदुरी–अभोणा रस्त्यावर चिखली पाडा फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत दोन युवक गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुझुकी कंपनीची कार (क्रमांक MH 41 BR 1283) नांदुरीकडून अभोण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH 41 BT 0626) अभोण्याकडून नांदुरीच्या दिशेने येत होती. चिखली पाडा फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस ठाण्याचे हवालदार योगेश गवळी आणि मनसराम बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक बेनके आणि समीर बेनके यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत केली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

संकटाच्या वेळी माणुसकी धावली!

अपघाताच्या प्रसंगी पोलिस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या मदतीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Post a Comment

0 Comments