Ticker

6/recent/ticker-posts

तळोद्यात शॉर्टसर्किटमुळे माजी सैनिक शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळून खाक



 दैनिक लोकयुवा वलवाल/धडगाव प्रतिनिधी: अर्जुन पावरा

तळोदा शहरातील अक्कलकुवा रोड परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत माजी सैनिक शेतकरी राजेंद्र धोंडू माळी यांच्या शेतातील अडीच एकर उभा ऊस जळून खाक झाला. ऐन पीक हातातोंडाशी आलेले असताना घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतातील उसाची पाचाळ पूर्णपणे सुकलेली असल्याने आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने संपूर्ण क्षेत्राला वेढले. घटनेची माहिती मिळताच तळोदा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा वेग मोठा असल्याने अडीच एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान झाले. या वेळी शेजारील शेतकरी गोलू दातीर आणि राहुल पाटील यांनीही मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने पिकाचे मोठे नुकसान केले होते.

शेतकरी राजेंद्र माळी यांनी महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक आगीत जळून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करावा तसेच विद्युत वाहिन्यांची तपासणी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments