घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबरपासून कालव्याला पाणी सोडणार
दैनिक लोकयुवा जालना / संतराम जाधव
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, जायकवाडी (पैठण) येथील नाथसागर धरणातून शेतीसाठी चार पाणी आवर्तने मंजूर करण्यात आली आहेत. आमदार हिकमत दादा उढाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला यश आले असून, येत्या ५ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने आणि उन्हाळी हंगामासाठी एक आवर्तन, अशी एकूण चार आवर्तने मंजूर करण्यात आली.
पाणी आवर्तनाचे वेळापत्रक
मंजूर करण्यात आलेल्या पाणी आवर्तनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
१) पहिले आवर्तन : ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर
२) दुसरे आवर्तन : १५ डिसेंबर ते ८ जानेवारी
३) तिसरे आवर्तन : फेब्रुवारी महिन्यात
४) चौथे आवर्तन : उन्हाळी हंगामात
येत्या ५ नोव्हेंबर रोजी कालव्याला पाणी सोडण्यात येणार असून, गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यांमध्येही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार हिकमत दादा उढाण यांच्या पाठपुराव्याला यश
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, पिकांना जीवदान मिळावे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला आजच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार आवर्तनांच्या मंजुरीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उन्हाळी हंगामातही पाण्याची उपलब्धता होणार आहे.
या निर्णयामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार हिकमत दादा उढाण यांनी तसेच शेतकऱ्यांच्या वतीने आभार व धन्यवाद व्यक्त केले आहेत.

0 Comments