दैनिक लोकयुवा प्रतिनिधी : प्रतीक वाढई
नागपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या मेडिकल चौक परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पलाश प्रकाश वासनिक असे मृत तरुणाचे नाव असून, या हत्येमध्ये त्याच्याच साळ्याचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकल चौक परिसरात ही घटना घडली. पलाश वासनिक याच्यावर त्याच्या साळ्याने जीवघेणा हल्ला केल्याचा संशय आहे. संशयित आरोपी हा इमामवाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविला.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून हा रक्तरंजित प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अजनी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.
कौटुंबिक वादातून थेट हत्येपर्यंत मजल गेल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

0 Comments