Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष सौ.पंचशीला वाल्मिक इंगोले यांनी वर्षभरातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा



पत्रकार परिषद घेऊन विकासकामांची माहिती जाहीर करण्याची दिग्रसच्या नागरिकांची मागणी


दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

 नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी सौ.पंचशीला वाल्मिक इंगोले यांचा कार्यकाळ दि.२२ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाला. नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आजपर्यंत शहराच्या विकासासाठी नेमकी कोणती कामे करण्यात आली, याचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी दिग्रस शहरातील नागरिकांकडून होत आहे.

दिग्रसच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्षांना पहिली पसंती देत नेतृत्वाची संधी दिली. मात्र, जनतेने दाखविलेल्या विश्वासाला कितपत प्रतिसाद मिळाला, हे प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पथदिवे, अतिक्रमण तसेच इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत नगरपरिषद प्रशासनाने आणि नगराध्यक्षांनी कोणती ठोस पावले उचलली, किती कामे पूर्ण झाली, किती निधी मंजूर झाला आणि किती निधी खर्च करण्यात आला, याची माहिती नागरिकांना मिळावी.

त्यामुळे नगराध्यक्ष सौ.पंचशीला वाल्मिक इंगोले यांनी स्वतः पत्रकार परिषद आयोजित करून दि. २२ डिसेंबर २०२५ पासूनच्या कार्यकाळातील विकासकामांचा सविस्तर अहवाल, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च आणि प्रलंबित कामांची माहिती दिग्रसच्या जनतेसमोर सादर करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जनतेने दिलेला विश्वास ही लोकप्रतिनिधींसाठी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामांची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी दिग्रसच्या नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments