Ticker

6/recent/ticker-posts

अखेर मतिमंद नितीनला मिळाले निवडणूक ओळखपत्र



‘आम्ही दिग्रसकर संघटने’च्या प्रयत्नांना यश; शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा


दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

 संघर्ष करत जीवन जगणाऱ्या एका दिव्यांग तरुणाला अखेर ओळख मिळवून देण्यात ‘आम्ही दिग्रसकर संघटने’ला यश आले आहे. दिग्रस तालुक्यातील वाई मेंढी येथील २५ वर्षीय मतिमंद तरुण नितीन दिलीप झोडगे याला अखेर निवडणूक ओळखपत्र (मतदार ओळखपत्र) मिळाले असून, संघटनेच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नितीन झोडगे हा जन्मजात मतिमंद असून, लहानपणापासूनच अनेक अडचणींचा सामना करत आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या नितीनचा उदरनिर्वाह त्याची आई शेतमजुरी करून करते. आई-वडील अशिक्षित असल्यामुळे नितीनची जन्मनोंदणी झाली नव्हती. तसेच दिव्यांगत्वामुळे त्याला शाळेतही जाता आले नाही. परिणामी त्याच्याकडे जन्मदाखला, आधारकार्ड तसेच निवडणूक ओळखपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे तो अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित होता.

दरम्यान, नितीनचे मामा दुर्गेश निथळे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आम्ही दिग्रसकर संघटने’च्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ संघटनेचे अध्यक्ष पत्रकार अफजल खान आणि दिग्रस नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांच्याशी संपर्क साधून नितीनला मदत करण्याची विनंती केली.

यानंतर ‘आम्ही दिग्रसकर संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आवश्यक पाठपुरावा केला. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, दिग्रस तहसील कार्यालयात तहसीलदार मयूर राऊत यांच्या हस्ते नितीन झोडगे याला निवडणूक ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी ‘आम्ही दिग्रसकर संघटने’चे अध्यक्ष पत्रकार अफजल खान, पत्रकार सुरेश चिरडे, माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, महंत मनोज राठोड महाराज, अनिल भरारे, स्वप्नील दुधे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितीनला केवळ निवडणूक ओळखपत्र मिळवून देणे एवढ्यावरच संघटनेचे कार्य थांबणार नसून, त्याला पुढील काळात सर्व पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष पत्रकार अफजल खान यांनी दिली.

एका गरजू दिव्यांग तरुणाला शासकीय व्यवस्थेच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे. कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या नितीनसाठी आता मदतीचे नवे दरवाजे उघडले आहेत.




Post a Comment

0 Comments