नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार; स्वतंत्र चौकशीसह दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
दैनिक लोक युवा जालना / संतराम जाधव
जालना शहरातील भूमिगत गटार योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातील कथित आर्थिक अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे तसेच अपूर्ण प्रकल्पाचा मुद्दा आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित करणार असल्याची भूमिका मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. त्यांनी स्वतःच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
जालना शहरासाठी १०८.७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही भूमिगत गटार योजनेची कामे अद्याप पूर्ण का झाली नाहीत? कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायम का आहे? जनतेच्या पैशाचा हिशेब कोण देणार? असे सवाल आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ते विधानसभेत करणार आहेत. तसेच महानगरपालिका आयुक्तांसह दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दोषींची मालमत्ता जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जालना शहराच्या विकासासाठी आलेला जनतेचा पैसा नेमका कुठे खर्च झाला, याचा पाई-पाईचा हिशेब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे.
दरम्यान, आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर भूमिगत गटार योजनेच्या कामकाजाबाबत काय माहिती समोर येते आणि शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे जालना शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

0 Comments