दैनिक लोक युवाआर्वी प्रतिनिधी पवन शिरभाते
तिवसा ग्रामीण रुग्णालयातील बंद पडलेली डायलिसिस सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमधील मोफत रक्त तपासणी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक, तिवसा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी अपर जिल्हाधिकारी, अमरावती यांची भेट घेऊन निवेदन सादर केले असून जिल्हा शल्यचिकित्सकांनाही स्वतंत्र निवेदन देत खासदार बळवंतराव वानखडे यांच्यामार्फत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने अनेक ठिकाणी डायलिसिस, मोफत रक्त तपासणी यांसारख्या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा प्रभावित होत आहेत. याचा सर्वाधिक फटका सामान्य, गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्याने मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत वैभव वानखडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तिवसा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्यासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत रक्त तपासणी व इतर आरोग्य सुविधा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नयेत, अशी मागणी केली आहे. संबंधित सेवा पुरवठादारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करून आवश्यक मनुष्यबळ, औषधे, साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती यांना लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तिवसा येथील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू होण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्यसेवा ही नागरिकांची मूलभूत गरज असून आर्थिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे गरीब रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवता कामा नये. तिवसा शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण रुग्णांचे हाल थांबवून डायलिसिस व मोफत तपासणी सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी ठाम भूमिका वैभव वानखडे यांनी मांडली आहे.ही माहिती आशिष देशमुख यांनी कळविली आहे.

0 Comments