दैनिक लोक युवा प्रतिनिधी सागर काळे
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात भारतीय हवाई दलातील जवानाचा करुण अंत झाला. गोविंद भागवत नेहरकर (वय ३०, रा. ढोकवजगाव) असे या मृत जवानाचे नाव असून, त्यांचा सख्खा भाऊ गोपाळ नेहरकर (वय २६) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
हे दोन्ही भाऊ एकाच दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला हा भयंकर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तत्काळ धाव घेत जखमी गोपाळला गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोविंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. देशसेवा बजावणाऱ्या सुपुत्रावर अचानक काळाने घाला घातल्याने ढोकवजगाववर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments