Ticker

6/recent/ticker-posts

बालदिनाच्या निमित्ताने पालघर पोलिसांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद; शिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे!



मोठी स्वप्ने पाहा, आत्मविश्वासाने पुढे चला! पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; पोलीस ठाण्याच्या कामकाजाचीही घडवली ओळख


दैनिक लोक युवा पालघर जिल्हा प्रतिनिधी : केविल पाटील 

पालघर : बालकांच्या मनात शिक्षणाची गोडी, सुरक्षिततेची जाणीव आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रुजविण्याच्या उद्देशाने पालघर पोलीस ठाण्यात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी आयोजित या उपक्रमातून पोलिसांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना शिक्षण, शिस्त, सायबर सुरक्षा आणि जीवनातील ध्येयपूर्तीचे महत्त्व पटवून दिले. पोलिसांचे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी केवळ माहितीपर नव्हे, तर प्रेरणादायी अनुभव ठरले.

यावेळी पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, अभ्यासाला प्राधान्य द्यावे आणि आयुष्यात मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वास ही यशस्वी जीवनाची भक्कम पायाभरणी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएसआय प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. मोबाईलचा वापर शैक्षणिक कामांसाठी करावा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद संकेतस्थळांपासून दूर राहावे आणि आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या. इंटरनेटचा वापर करताना सतर्कता आणि जबाबदारी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, पीएसआय जाधव यांनी पोलीस दलात वापरण्यात येणारी विविध शस्त्रे, त्यांचे स्वरूप व कार्यपद्धती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच पोलीस ठाण्यातील विविध विभाग, त्यांची जबाबदारी आणि पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची ओळख करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेचे काम जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.

या उपक्रमात आर्यन म.नी. दांडेकर हायस्कूलचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक निलेश भोईर, अमित धांगडा उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेचे अॅड. राजेश राऊत, त्यांचे सहकारी तसेच संघटनेतील बालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पालघर पोलीस ठाण्याच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

*पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील संवादाचा सकारात्मक दुवा*

बालदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पोलीस ठाणे हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे केंद्र नसून समाजातील बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जडणघडणीसाठीही संवेदनशील असल्याचा संदेश देण्यात आला. शिक्षणाची प्रेरणा, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता आणि पोलीस यंत्रणेची प्रत्यक्ष ओळख अशा विविध पैलूंनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Post a Comment

0 Comments