Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रसच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा



गझलकारा सौ.आरती पद्मावार यांच्या 'इच्छा घार होताना' संग्रहाला प्रतिष्ठेचा 'संत नामदेव राष्ट्रीय गझल पुरस्कार २०२६' जाहीर

दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 


हिंगोली येथील सुप्रसिद्ध 'समृद्धी प्रकाशन'च्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा 'संत नामदेव राष्ट्रीय गझल पुरस्कार' दिग्रस येथील प्रख्यात गझलकारा सौ. आरती पद्मावार यांच्या 'इच्छा घार होताना' या गाजलेल्या गझल संग्रहाला जाहीर झाला आहे.

या निवडीबाबतची अधिकृत माहिती समृद्धी प्रकाशनचे प्रा. डॉ. श्रीराम मारोतीराव कऱ्हाळे यांनी अधिकृत पत्राद्वारे दिली आहे. त्यांच्या या निवडीने दिग्रस शहरासह संपूर्ण विदर्भाच्या साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साहित्य विश्वात कर्तृत्वाचा ठसा

सौ. आरती पद्मावार या मराठी साहित्य क्षेत्रातील एक आघाडीच्या गझलकारा असून त्यांनी आपल्या संवेदनशील लेखणीतून विपुल साहित्य निर्मिती केली आहे. त्यांचे यापूर्वी 'क्षण जपताना' (काव्यसंग्रह), 'जाऊ फुलांच्या जगात' (कुमार काव्यसंग्रह), 'सहजपणे संचालन' (चारोळी संग्रह) यासह बालसाहित्याशी संबंधित तब्बल १० पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

'इच्छा घार होताना' गझल संग्रहाचा पुरस्कारांचा पंच

त्यांच्या 'इच्छा घार होताना' या गझल संग्रहाने साहित्य विश्वात नवी ओळख निर्माण केली असून या संग्रहाने यापूर्वी अनेक नामांकित पुरस्कार पटकावले आहेत:

लक्ष्मीबाई गुलाबराव सोमकुंवार स्मृती उत्कृष्ट गझल संग्रह गौरव पुरस्कार, पुणे ,संत गाडगे महाराज विचार मंच व ज्ञानज्योत फाउंडेशन (मांजरी, हडपसर, पुणे) यांचा राज्यस्तरीय पुरस्कार,गझलनिष्ठ प्रतिष्ठान, ठाणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार,स्व. सुरेश भट राज्यस्तरीय पुरस्कार,आणि आता प्रतिष्ठेचा संत नामदेव राष्ट्रीय गझल पुरस्कार २०२६, हिंगोली

या राष्ट्रीय सन्मानामुळे दिग्रसच्या सांस्कृतिक व साहित्यिक वैभवात मोलाची भर पडली असून विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. आरती पद्मावार यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments