दैनिक लोक युवा प्रतिनिधी फैजान खान
जव्हार : केंद्र तथा राज्य शासनाच्या निरनिराळ्या कल्याणकारी योजनेतून शिक्षणाचा दर्जा जव्हार तालुक्यातून उंचावू लागला आहे. शासन, प्रशासन आणि राजकीय पदावर येथील शिक्षित वर्ग समाविष्ट झाल्याने तालुक्याची प्रगती होऊ लागली आहे. अशातच
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या पुरस्कारांमध्ये कासटवाडी ग्रामपंचायतीने द्वितीय, तर हातेरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या विकासकामांना चालना देणे, मूलभूत सुविधांचा विस्तार करणे, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला होता. ग्रामपंचायतींचे विविध निकषांवर मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.
कासटवाडी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पेश राऊत आणि हातेरी ग्रामपंचायतचे सरपंच विनायक कळकरगा यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, मूलभूत सुविधांची उपलब्धता, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग या बाबींमुळे त्यांना हे यश मिळाले आहे.
विशेष म्हणजे, आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागातील मर्यादित साधनसंपत्ती असतानाही या ग्रामपंचायतींनी विकासकामांमध्ये सातत्य राखले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.
या यशामुळे जव्हार तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनाही विकासकामांसाठी प्रेरणा मिळणार असून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments