दैनिक लोक युवा जव्हार:
आधुनिक आणि डिजिटल युगात अनेक पारंपरिक सण, उत्सव आणि लोकसंस्कृती काळाच्या ओघात लोप पावत असल्याचे चित्र दिसत असताना, जव्हार तालुक्यातील साकूर गावातील आदिवासी बांधवांनी मात्र आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा आजही जपली आहे. दिवाळीची सुरुवात वाघबारशीच्या पारंपरिक उत्सवाने करण्याची प्रथा येथे आजही श्रद्धेने पाळली जाते. विशेष म्हणजे, या उत्सवात गावातील ज्येष्ठांसह तरुण आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे अभिमानाने सुपूर्द होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
वाघबारशीचा उत्सव तीन दिवस चालतो. पहिल्या दिवशी गावातील पुरुष, तरुण आणि लहान मुले मरीआईच्या मंदिरात एकत्र येतात. येथे वाघदेव, डोंगरमाऊली आणि मावळ कड्याची पारंपरिक पूजा केली जाते. जंगलात चरणाऱ्या पाळीव जनावरांचे तसेच त्यांची राखण करणाऱ्या गुराख्यांचे वाघापासून संरक्षण व्हावे, या श्रद्धेतून वाघदेवाला बकऱ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. शेतीतील नव्या धान्यापासून तयार केलेला दूधभात मावळ कड्याला अर्पण केला जातो. जंगल, वन्यजीव, शेती आणि पिकांचे रक्षण व्हावे, या भावनेतून डोंगरमाऊलीचीही पूजा केली जाते.
या उत्सवातील आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे नवीन माऊल्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया. यासाठी संबंधित तरुणांना काही धार्मिक नियमांचे पालन करावे लागते. दिवसभर उपवास, शाकाहार, केस न कापणे तसेच काही विशिष्ट खाद्यपदार्थांचे सेवन टाळणे अशा पारंपरिक नियमांचे पालन केले जाते. त्यानंतर धार्मिक विधींतून त्यांना माऊली म्हणून स्थान दिले जाते. दुसऱ्या दिवशी नवीन आणि जुन्या माऊल्या मावळ कड्यावर स्नानासाठी जातात. तेथे मावळ कड्याची पूजा केली जाते. या ठिकाणी काही व्यक्तींना पारंपरिक श्रद्धेनुसार अंगात वारे येण्याचा अनुभव येतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
या उत्सवात मखमलीचे फूल आणि कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक माऊलीच्या हातात घोळकाठी असते. या सर्व परंपरा उत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करतात.
**परंपरेचा अभिमान, नव्या पिढीचा पुढाकार!**
आजच्या बदलत्या जीवनशैलीतही साकूरमधील तरुण आणि लहान मुले या उत्सवात उत्साहाने सहभागी होत आहेत. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या रूढी, परंपरा आणि श्रद्धास्थानांविषयी नव्या पिढीमध्ये निर्माण झालेली आस्था ही आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने आशादायी बाब आहे. केवळ सण साजरा न करता त्यामागील सांस्कृतिक महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम येथील तरुणाई करत आहे.
"जव्हार तालुक्यातील ऐतिहासिक आणि पारंपरिक सण-उत्सव साजरे करताना आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन केला जात आहे. आजच्या डिजिटल युगात आपल्या पूर्वजांनी जपलेल्या रूढी, परंपरा आणि श्रद्धा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही अभिमानाची बाब आहे. अशा परंपरांमध्ये सहभागी होताना माझ्यासारख्या अनेक तरुणांमध्ये आपल्या मातीविषयीचा जिव्हाळा, सांस्कृतिक आपलेपणा आणि समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट होत आहे." भरत गवळी, साकुर

0 Comments