Ticker

6/recent/ticker-posts

जव्हार वनविभागात योग शिबिर



जव्हार, दि.१६; प्रतिनिधी फैजान खान 

जव्हार : सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जव्हार वनविभागाच्या वतीने फॉरेस्ट डेपो येथे योग शुक्रवारी सकाळी सात वाजता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वनविभागातील सुमारे ८० ते ९० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

     उपवनसंरक्षक सैपून शेख आणि सहायक वनसंरक्षक आयुष कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्राथमिक शिक्षक व कवी रवी बुधर यांनी उपस्थितांना योगासनांचे महत्त्व पटवून देत विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनाच्या योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम आणि नियमित व्यायामाचा दैनंदिन जीवनात समावेश करावा, असे आवाहनही करण्यात आले.

    दरम्यान, वनपाल विजय मोरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे झालेली ऑलिम्पिक अंतराची ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. पोहणे १.५ किलोमीटर, सायकलिंग ४० किलोमीटर आणि धावणे १० किलोमीटर अशी आव्हानात्मक स्पर्धा त्यांनी ५ तास १६ मिनिटे ९ सेकंदांत पूर्ण केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जव्हार वनविभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

    दक्षिण जव्हारचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंबादास शिरसाट यांनी शिबिराचे नियोजन केले. दक्षिण व उत्तर जव्हार, खोडाळा, सावा, मोखाडा, गस्त पथक आणि रोहयो विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments