२०२१ ते २०२५ मधील सर्व विहिरींची चौकशी करा; तक्रारदारांची मागणी
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे
बिलोली तालुक्यातील मौजे दौलापूर येथील मनरेगा विहीर प्रकरण सध्या चर्चेत आले असून, सन २०२१ ते २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांच्या नावावर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे विहिरी मंजूर करून शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
दौलापूर येथील सुमारे १० ते १२ तक्रारदारांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. काही शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर विहीर मंजूर झाल्याची माहितीच नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर प्रत्यक्ष कामे दाखविण्यात आली आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दौलापूर येथील एका शेतात JCBच्या साहाय्याने विहिरीचा खड्डा बुजविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी JCB चिखलात अडकल्याचा प्रकार ग्रामस्थांनी पाहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाला अधिक वाचा फुटली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, JCB कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आली होती, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदमवार यांच्या भूमिकेबाबतही तक्रारदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विहिरींची मंजुरी, कागदपत्रांची पडताळणी, कामाची नोंद आणि निधी वितरणाची प्रक्रिया यामध्ये नेमकी कोणाची जबाबदारी होती, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दौलापूरपुरती चौकशी नको; संपूर्ण तालुक्याचा हिशोब तपासा! सन २०२१ ते २०२५ या कालावधीत बिलोली तालुक्यात मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व विहिरींची कागदपत्रे, लाभार्थी, निधी वितरण व प्रत्यक्ष कामांची स्थळ तपासणी करावी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार व ग्रामस्थांकडून होत आहे.

0 Comments