Ticker

6/recent/ticker-posts

धडगाव येथे सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन परिषद उत्साहात; वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीवर चर्चा



धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा

एस. व्ही. ठकार महाविद्यालय, धडगाव येथील सभागृहात सामुदायिक वनहक्क अधिकार व्यवस्थापन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत सामुदायिक वनहक्कांची प्रभावी अंमलबजावणी, सद्यस्थितीतील आव्हाने, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि आगामी विकासाच्या दिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. गजानन डांगे यांनी भूषविले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र दहातोंडे, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार; गणेशदादा पराडके, माजी शिक्षण व वित्त सभापती, जिल्हा परिषद नंदुरबार; दिलीप पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य, धडगाव; संदीप वळवी, सरपंच, कात्री; रामसिंग वळवी, माजी पंचायत समिती सदस्य, अक्कलकुवा; गेमलसिंग वळवी, खुंटामोडी; राकेश पावरा, सरपंच, फलाई; सुरेश पावरा, सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगावचे संस्थापक अध्यक्ष कै. जनार्दन महाराज, आदिवासी कुलदैवत देवमोगरा माता आणि भारतमातेच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

सामुदायिक वनहक्कांतून गावपाड्यांच्या विकासाला चालना द्या – गणेशदादा पराडके

प्रास्ताविकात गणेशदादा पराडके यांनी सामुदायिक वनहक्कांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. धडगाव तालुक्यातील १४३ गावांना सामुदायिक वनहक्क प्राप्त झाले असून, या अधिकारांच्या माध्यमातून चारा लागवड आणि वनोपज संकलनासह स्थानिक विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वनहक्क समितीच्या सदस्यांनी या अधिकारांचा पुरेपूर उपयोग करून गावपाड्यांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नंदुरबार डेव्हलपमेंट समिट २०२६ मध्ये धडगाव तालुक्याचा सक्रिय सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भविष्यात वनोपजांवर आधारित प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा मानसही व्यक्त केला. या उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शासकीय योजनांतील अडचणी मांडल्या

यावेळी मुकेश वळवी यांनी शासकीय योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. विशेषतः ‘मस्टर झिरो’ आणि ‘बिहार पॅटर्न’ योजना राबविताना निर्माण होणाऱ्या अडचणी व त्यातून मार्ग काढण्याची गरज त्यांनी मांडली.

कुंभरीत १,१०० रोपांचे संगोपन; वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कुंभरी येथील सेगा पटले यांनी गणेशदादा पराडके यांच्या माध्यमातून मिळालेल्या १,२०० रोपांपैकी १,१०० रोपे स्वतःच्या वनहक्क क्षेत्रात जगविल्याची माहिती दिली. या रोपांची पाहणी करण्यासाठी गणेशदादा पराडके यांनी उंच टेकडीवर पायी जाऊन भेट दिली. या उपक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याने सेगा पटले यांनी वृक्षलागवड व संगोपनाचे काम सातत्याने सुरू ठेवले असून, आजपर्यंत सुमारे ९,००० झाडे जिवंत असल्याचे सांगण्यात आले.

सामुदायिक वनहक्कांचा प्रभावी वापर, वनसंपत्तीचे संवर्धन, वनोपजांवर आधारित रोजगारनिर्मिती आणि गावपाड्यांचा शाश्वत विकास यांसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments