आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा; जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन
धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा
नंदुरबार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार शहरात १३ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरसिंग राणा होते, तर उद्घाटन माडा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांच्या हस्ते झाले. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला व पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जयदीप कांबळे, प्रतीक्षा चव्हाण, अॅड. रणजीत पाडवी, अॅड. सुजाता चौदांते, संजय पावरा, जमन ठाकरे, डॉ. शरद चव्हाण, अॅड. सुभाष वळवी, पतंगराव खोकले, नूर सलीम सिकलीगर, अजय वळवी, लालसिंग तडवी, सुनील महिरे, संजू रगडे आणि नंदू बैसाणे उपस्थित होते.
आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा
प्रबोधन सत्र दोन टप्प्यांत पार पडले. यावेळी आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, कुपोषण आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वामन मेश्राम यांनी स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजासमोर अनेक समस्या कायम असल्याचे सांगितले. डी-लिस्टिंग, संविधानातील पाचवी व सहावी अनुसूची आणि आदिवासींच्या हक्कांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांत १९७०–८० च्या दशकात शासनाकडून आदिवासींना देण्यात आलेल्या जमिनींबाबत प्रश्न उपस्थित करत, त्या जमिनी परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला. यासंदर्भातील शासनाच्या परिपत्रकाचा निषेध व्यक्त करत त्यांनी ते फाडले.
आदिवासींनी संघटित होण्याचे आवाहन
राष्ट्रीय अध्यक्ष वीरसिंग राणा यांनी विस्थापनाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. डोंगराळ भागांतील खनिज संपत्तीच्या उत्खननामुळे आदिवासींच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी मांडले. आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी देशभरातील आदिवासींनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशनात उपस्थित अन्य मान्यवरांनीही आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निकुंभे यांनी केले, तर कैलास डोखले यांनी आभार मानले.
अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी जिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी, संतोष शिरसाठ, ईश्वर वसावे, कनवर वळवी, लालसिंग पाडवी, किसन वसावे, बिरबल वळवी, अकबर वळवी, लालसिंग वसावे, गणेश वसावे, चंद्रसिंग वसावे, वीरसिंग वसावे आणि सेगा वसावे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments