Ticker

6/recent/ticker-posts

या छोट्याशा गावाची "तनुश्री सचिन जगदाळेची" ची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे निवड



दैनिक लोकयुवा आर्वी प्रतिनिधि, पवन शिरभाते 

आर्वी : सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे आर्वी येथील कु. तनुश्री सचिन जगदाळे हिने सिद्ध करून दाखविले आहे. तनुश्रीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे आर्वी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तनुश्रीने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये ५३० गुण प्राप्त केले. तसेच बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून तिने आपल्या बुद्धिमत्तेची आणि अभ्यासातील सातत्याची चुणूक दाखवून दिली होती. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने सातत्याने अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले.

तनुश्रीचे वडील सचिन जगदाळे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक म्हणून कार्यरत आहेत. सामान्य कुटुंबातील परिस्थिती असतानाही आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी तिच्या शिक्षणासाठी मोलाचे कष्ट घेतले. वडिलांचे प्रोत्साहन, त्याग आणि तनुश्रीची जिद्द यांचा सुंदर संगम या यशातून दिसून येतो.

आजच्या स्पर्धेच्या युगात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविणे हे मोठे आव्हान असताना तनुश्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या यशातून ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळू शकते, हा संदेश तनुश्रीने आपल्या कर्तृत्वातून दिला आहे.

तनुश्रीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. तिच्या यशामागे भक्कमपणे उभे राहणारे वडील सचिन जगदाळे यांचेही विशेष कौतुक होत आहे. मुलीच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या वडिलांचा त्याग आणि मुलीची मेहनत यांचा हा प्रेरणादायी गौरव आहे.

Post a Comment

0 Comments