डोंगरगाव बिट व परिसरात दहशत ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
धनराज सरपाते - दैनिक लोकयुवा प्रतिनिधी
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या डोंगरगाव बीट परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या दोन गंभीर घटना घडल्या असून दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पळसगाव (जाट) येथील शेतकरी नानाजी नारायण कामडी (वय ६०) आणि भेंडाळा (खातगाव) येथील महिला प्रेमीला बंडू महाडोरे (वय ५५) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
शेतात गेलेले शेतकरी परतलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तीन वाजताच्या सुमारास पळसगाव (जाट) येथील शेतकरी नानाजी नारायण कामडी हे शेतात कापून ठेवलेले तीळ आणण्यासाठी गेले होते. मात्र, रात्र होऊनही ते घरी परतले नाहीत. परिसरात वाघ असल्याची चर्चा असल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शेतशिवारात शोध घेतला. यावेळी शेतातील बांधावर त्यांचा त्यांचा मृतदेह आढळून आला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
महिलेवरही वाघाचा हल्ला
दुसऱ्या घटनेत, डोंगरगाव बिटातील भेंडाळा (खातगाव) येथील प्रेमीला बंडू महाडोरे या आंगणवाडी सेविका असुन रविवार सुट्टी असल्याने पतीसोबत शेतावर गेल्या असताना, रविवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सलग दोन दिवसात घडलेल्या या घटनामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच वन विभागाला सूचना देण्यात आली. सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी अंजली बोरावार/ सायंकार व वनकर्मचारी, सिंदेवाही येथील पोलीस निरीक्षक लता वाडीवे, त्यांची पोलीस टीम तसेच स्वाब संस्थेचे यश कायरकर व त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहाणी करून पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच हल्लेखोर वन्यप्राण्याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी लाईव्ह कॅमेरे व ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत.
वाघाच्या हालचा हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक
या परिसरात काही दिवसापासून वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. त्यामुळे वनविभागाने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमून परिसरातील गस्त वाढविली आहे. मात्र, सलग दोन दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने वनविभागाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात जात आहेत. अशा परिस्थितीत वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने वाघाच्या हालचालींचा शोध घेऊन नागरिकांना सतर्क करावे, तसेच नियमानुसार आवश्यक ती तातडीची उपाययोजना करून वाघाच्या दहशतीतून परिसरातील नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे

.jpg)
0 Comments