Ticker

6/recent/ticker-posts

घनकचरा निविदेप्रकरणी नगरसेविका सौ.सीमा विजेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; शासनाला चार आठवड्यांत निर्णयाचे निर्देश



*अंजनगाव सुर्जी न.प. निविदेतील अटींवर आक्षेप; नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रकरण


दैनिक लोक युवा अंजनगाव सुर्जी :प्रतिनिधी

 अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील अटींना आव्हान देणाऱ्या नगरसेविका सौ. सीमा गजानन विजेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित याचिकेला निवेदन म्हणून ग्राह्य धरून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी कायद्यानुसार चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

             नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा क्रमांक १९८२, दि.४ सप्टेंबर २०२६ मधील काही अटी शासनाच्या धोरणाशी विसंगत असल्याचा आणि निविदा प्रक्रियेत समान संधीच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप सौ. विजेकर यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला होता.

न्यायालयासमोर निविदेतील अटी क्रमांक ६,१०,१५,१७ आणि १८ तसेच निविदादारांकडून अनामत रक्कम मागण्याच्या तरतुदीबाबत आक्षेप मांडण्यात आले. या मुद्द्यांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याची जबाबदारी शासनावर सोपविण्यात आली आहे. न्यायालयाने पुढे असेही स्पष्ट केले की, निविदा प्रक्रियेबाबतचा निर्णय हा शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहील. त्यामुळे आता नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांचे आणि संबंधित निविदादारांचे लक्ष लागले आहे.सौ. सीमा गजानन विजेकर यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि संबंधित कागदपत्रांसह निवेदन सादर करून या प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

“निविदा प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि शासनाच्या नियमांनुसार व्हावी, हा या प्रकरणामागील मुख्य उद्देश आहे,” अशी भूमिका या प्रकरणाच्या अनुषंगाने मांडण्यात येत आहे. न्यायालयात मोहम्मद रेहान अ. मुनाफ (नप शिक्षण सभापती), इब्राहिम बेग हसन बेग (नप बांधकाम सभापती), श्रीकांत जुनघरे नगरसेवक, अविनाश ढेंगे नगरसेवक, सौ.सुनिता भास्कर बाळे नगरसेविका, सौ.आबेदाबी मो. आरिफ नगरसेविका व इतर नगरसेवक सोबत होते. यासंदर्भात याचीकाकर्त्या नगरसेविका सीमा गजानन विजेकर यांचेतर्फे अॕड अनिरुद्ध चांदेकर यांनी ऊच्च न्यायालयात बाजु मांडली.

Post a Comment

0 Comments