दैनिक लोक युवा काटोल प्रतिनिधी:- विकास सोमकुवर
खराळा, ता. नरखेड : बालमजुरी निर्मूलन आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती करण्यासाठी खराळा येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अॅग्रीजेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व विजय कॉटन अँड फायबर व्ही.ओ. एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढत ‘बालमजुरी थांबवा, प्रत्येक मुलाला शिकवा’, ‘मुलगा-मुलगी एक समान’ अशा घोषणांद्वारे ग्रामस्थांचे लक्ष वेधले. बालकांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व आणि समान संधी याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. बुद्धभूषण वानखेडे, प्रकल्प व्यवस्थापक (पुनरुत्पादक व सेंद्रिय शेती) व अमोल जीवतोडे, प्रकल्प अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. बालमजुरीमुळे मुलांच्या शैक्षणिक व मानसिक विकासावर होणारे परिणाम स्पष्ट करत बालमजुरी रोखण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच राहुलजी कांबडी व पोलीस पाटील अमोलजी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन गणेश उईके, क्षेत्रीय अधिकारी, तसेच शुभम वानखेडे व गौरव फांदी, क्षेत्र समन्वयक यांनी शिक्षकांच्या सहकार्याने केले.
‘बालमजुरीला नकार, शिक्षणाचा स्वीकार; स्त्री-पुरुष समानतेतून घडवूया प्रगत समाज!’ असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments