दैनिक लोक युवा धडगाव प्रतिनिधी: अर्जुन पावरा
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सणपुळे येथील दादासो पी. जे. पाटील प्राथमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बाथरूम, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या समस्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रकल्प प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जयेश पावरा, नामसिंग पावरा, अविनाश पावरा आणि आनंद पावरा यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी बाथरूम, स्वच्छतागृह तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणी निदर्शनास आणून दिल्या.
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडण्यात आला असून, प्रशासन याबाबत काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.
उपस्थित प्रतिनिधी : जयेश पावरा, नामसिंग पावरा, अविनाश पावरा आणि आनंद पावरा.

0 Comments