मध्यरात्री पानटपरीचे नुकसान बावधन पोलीस ठाण्याकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा रानवडे परिवाराचा आरोप
पुणे ग्रामीण : मुळशी तालुक्यातील नांदे येथील मिळकतीच्या वादातून रानवडे कुटुंबीयांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब चंद्रकांत साखरे यांनी बळजबरीने तार कंपाऊंड करून पानटपरीचे नुकसान केल्याचा आरोप सुरेखा गुलाब रानवडे यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, नांदे येथील सर्व्हे नं. ३१/४/४, वार्ड नं. १, मिळकत नं. ०४०३ येथे पक्के घर असून, त्याच्या शेजारी पानटपरी आहे. सदर पानटपरीवर रानवडे कुटुंबातील मुलाचा उदरनिर्वाह चालत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
११ सप्टेंबर रोजी पहाटे पानटपरीचे नुकसान करून ती सुमारे १०० फूट अंतरावर तुटलेल्या अवस्थेत फेकून देण्यात आल्याचा आरोप रानवडे कुटुंबीयांनी केला आहे. पानटपरी व त्यातील मालाचे मिळून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पानटपरीच्या उत्पन्नातून कर्जाचा हप्ता तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागविला जात होता. त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे रानवडे परिवाराने सांगितले.
दरम्यान, वारंवार बावधन पोलीस ठाण्यात तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप रानवडे कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे रानवडे कुटुंबीयांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून,आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
या घटनेमुळे आपल्यासह संपूर्ण कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती सुरेखा गुलाब रानवडे यांनी व्यक्त केली आहे. संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माझ्या कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह चालत असलेल्या पानटपरीवर जेसीबी चालवून माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणले आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी. अन्यथा भविष्यात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात येईल असे सुरेखा रानवडे यांनी सांगितले.

0 Comments