Ticker

6/recent/ticker-posts

चाकूचा धाक दाखवून ३.८७ लाखांचा दरोडा !


 

जुन्या मित्राच्या विश्वासाचा गैरफायदा; तिघांना अटक, अन्य आरोपींचा शोध सुरू

 प्रतिनिधी : बोरगाव जय गांगुर्डे 

 एक लाख रुपयांच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून जुन्या मित्राला निर्जनस्थळी बोलावले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत मारहाण करून रोख रकमेसह दोन महागडे मोबाईल, क्रेडिट व डेबिट कार्ड आणि लॅपटॉपची बॅग असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना वणी-फोकसी रस्त्यावर घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान वणीपासून पश्चिमेला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वणी-फोकसी रस्त्यावरील निर्जनस्थळी ही घटना घडली. फिर्यादी जेकब निक्लस फर्नांडिस (वय ३९, व्यवसाय पेस्ट कंट्रोल, रा. कल्याण पूर्व, जि. ठाणे) यांची आरोपी विजय आहेर याच्याशी शाळेपासून मैत्री होती. या ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेत आरोपीने एक लाख रुपयांच्या बदल्यात सहा

लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादीला रोख रकमेसह बोलावून घेतले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवला आणि हाताने मारहाण केली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा तवेरा गाडीत बसवून गाडीतही मारहाण केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी फिर्यादीकडील दोन लाख रुपये रोख, सुमारे दीड लाख रुपये किमतीचा आयफोन १५ प्रो मॅक्स, ३५ हजार रुपये किमतीचा वनप्लस मोबाईल, विविध बँकांची क्रेडिट व डेबिट कार्डे आणि काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (२) व १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय आहेर, संदीप शिंदे, प्रदीप गावित आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच अनोळखी व्यक्तींविरोधात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्यातील लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

तपास सुरू या गुन्ह्याचा तपास वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

Post a Comment

0 Comments