Ticker

6/recent/ticker-posts

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील कथित कट उघडकीस आणा!



ऑडिओ क्लिपसह ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन; पुर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी


ठाणे (प्रतिनिधी) तानाजी किर्दत

: ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, राम पुर्णेकर यांच्या आंदोलनात साध्या वेशातील व्यक्तींना घुसवून हल्ला घडवून आणण्याचा कथित कट एका ऑडिओ क्लिपमधून उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात पुर्णेकर कुटुंबीयांनी आतापर्यंत पोलिसांना तब्बल १६ वेळा महत्त्वाचे पुरावे सादर केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वारंवार पुरावे देऊनही या प्रकरणाची अपेक्षित आणि योग्य चौकशी होत नसल्याची नाराजी कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना संबंधित ऑडिओ क्लिप आणि सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी, कथित कटामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार तातडीने व निष्पक्ष कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

हत्या प्रकरणासारख्या गंभीर गुन्ह्यातील प्रत्येक पुराव्याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच, आंदोलनादरम्यान कथित हल्ल्याचा कट रचण्यात आला असल्यास त्यामागील संपूर्ण सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून पुर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.या वेळी ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे आणि मनसे नेते श्री. अविनाश जाधव उपस्थित होते.


“पुर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!”

संबंधित ऑडिओ क्लिपमधील दाव्यांची सत्यता तपासून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी हा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments