Ticker

6/recent/ticker-posts

धडगाव तालुक्यात अंगणवाड्यांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या अंड्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!



दोन ते तीन महिन्यांची अंडी एकत्र पुरवली जात असल्याची तक्रार; काही अंडी खराब निघत असल्याची माहिती


धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा

धडगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये आदिवासी बालकांना पोषण आहारांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या अंड्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी समोर येत आहेत. लहान बालकांना दिली जाणारी अंडी दोन ते तीन महिन्यांची एकत्रित पुरवली जात असल्याची माहिती मिळत असून, काही अंडी खराब निघत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अंगणवाड्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या अंड्यांमध्ये किडे आढळत असल्याच्या तसेच काही अंडी आतून पूर्णपणे खराब असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि बालकांना सकस आहार मिळावा या उद्देशाने शासनाकडून पोषण आहार दिला जातो. मात्र, त्याच आहारात निकृष्ट दर्जाची अंडी मिळत असतील, तर या योजनेच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महिला व बालविकास विभागाने तातडीने लक्ष द्यावे!

धडगाव तालुक्यातील संबंधित अंगणवाड्यांमध्ये पुरवठा होणाऱ्या अंड्यांची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था आणि वितरणाची पद्धत यांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी करावी. तसेच खराब अंड्यांचे नमुने तपासून दोष आढळल्यास संबंधित पुरवठादारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

लहान बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी संबंधित बाब असल्याने महिला व बालविकास विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन बालकांना ताजी, सुरक्षित आणि दर्जेदार अंडी मिळतील याची खात्री करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

प्रश्न असा आहे की, आदिवासी बालकांच्या पोषणासाठी दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार? याकडे आता संबंधित प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments