Ticker

6/recent/ticker-posts

जव्हार–शेगाव बससेवा सुरू करा; अन्यथा जनआंदोलन



जव्हार,  दैनिक लोक युवा  ; प्रतिनिधी फैजान खान 

जव्हार: जव्हार परिवहन आगारातून श्रीक्षेत्र शेगाव, श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि तुळजापूर या धार्मिक स्थळांसाठी मुक्कामी बससेवा सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश चुंबळे यांनी प्रवासी संघटनांच्या वतीने केली आहे. प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे परिवहन महामंडळ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

    जव्हार तालुक्यातील आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटी बससेवा ही महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. तालुक्यातून विविध धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, जव्हारहून शेगाव, अक्कलकोट आणि तुळजापूर येथे जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बस बदलणे, अतिरिक्त प्रवासखर्च करणे आणि वेळेचा अपव्यय सहन करणे, अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते.

   सध्या जव्हार आगारातून पंढरपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर शेगावसह अक्कलकोट आणि तुळजापूर या तीर्थक्षेत्रांसाठीही मुक्कामी बससेवा सुरू केल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या गरजा आणि जनभावनेचा आदर करून सुसज्ज, आरामदायी व सुरक्षित बससेवा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रकाश चुंबळे यांनी केली आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास प्रवासी संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments